अयोध्या- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेचा राहिला. हजारो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या हाकेला प्रतिसाद देत अयोध्येत पोहचले. उद्धव यांनी सहपरिवार शरयू नदीची काल ( शनिवारी ) महाआरती करून रामललेच दर्शन घेतलं. आज ( रविवार ) त्यांचा अयोध्या दौरा पूर्ण होत असून, राममंदिराच्या विषयावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मी समस्त हिंदूंच्या भावना लक्षात घेऊनच अयोध्येत आलो आहे. राममंदिर हा हिंदूंच्या भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. सरकारने हिंदूंच्या भावनेशी खेळू नये . जर राममंदिर बनलं नाही तर सरकारही बनणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मी इथे रामाच्या दर्शनासाठी आलो पण मला राम तुरुंगात असल्याचे जाणवले. मंदिरात जातोय की तुरुंगात असाच अनुभव आला. त्यामुळे तुम्ही कायदा करा, अध्यादेश काढा पण राममंदिर बांधा असे उद्धव यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे.
जर तुम्हाला ट्रिपल तलाक साठी किंवा अन्य कायदे करायला कोर्ट लागत नाही तर राममंदिर बांधायला कोर्टाच्या आदेशाची वाट कशाला पाहता. असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी सरकारला केला.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:-
१) रामाचं दर्शन घेतल्याने चैतन्याची अनुभूती.
२) लवकरात लवकर राम मंदिर बांधा
३) निवडणुकी आधी सगळे राम राम करतात, निवडणुकीनंतर मात्र आराम करतात
४) कोर्टाच्या हातात असेल तर राममंदिराचे आश्वासन कशाला देता
५) राम मंदिर बांधले नाही तर पुढे मंदिर बनेल पण सरकार बनणार नाही.
६) हिंदूंच्या भावनांशी खेळू नका
७) राम मंदिरात गेलो मात्र राम अद्यापही तुरुंगातच आहे असं वाटलं
८) राममंदिरात जातोय की तुरुंगात जातोय हेच कळत नाही
९) अध्यादेश काढा, कायदा करा पण राममंदिर बनवा
१०) अयोध्येत येण्यामागे कोणताही छुपा अजेंडा नाही
११) समस्त हिंदूंच्या भावना लक्षात घेत अयोध्या दौरा केला